अभिनेता : मिथुन चक्रवर्ती,अनुपम खेर,दर्शन कुमार,पल्लवी जोशी,मृणाल कुलकर्णी,चिन्मय मांडलेकर,प्रकाश बेलावडी,पुनित इसार,अतुल श्रीवास्तव दिग्दर्शक: प्रकार/शैली : Drama, History कालावधी : 2 Hrs 50 Min
View More
१९९० साली काश्मीरमध्ये घडलेल्या एका क्रूर घटनेची पार्श्वभूमी या चित्रपटात दाखवली आहे. एक्सोडस आणि जेनोसाइड यावरून भिन्न मतं आजही बघायला मिळतात.
त्या काळी मोठ्या संख्येने काश्मिरी पंडित त्यांची घरं सोडून निघून गेले (एक्सोडस) असं म्हटलं जातं. पण खरं तर ते निघून गेले नाहीत, त्यांचा क्रूर वंशविच्छेद (जेनोसाइड) करण्यात आला असा दावा हा चित्रपट करतो.
सिनेमाची गोष्ट आहे नव्वद सालची. हिंदू-मुस्लिम वाद त्यावेळी चिघळला होता. तेथील मुस्लिमांनी काश्मिरी पंडितांना उद्देशून ‘धर्मांतर करा, सोडून जा नाही तर मरा’ असा नारा लावला. या दहशतीखाली काश्मिरी पंडित राहात होते.
यांच्या डोक्यावर मृत्युची टांगती तलवार होती. ते जिवंतपणी मरण अनुभवत होते. ‘काश्मिर में हम सब जिंदा रहनेकी कोशिश कर रहें है और यही बहोत हिम्मत की बात है’ हा सिनेमातला संवाद त्या परिस्थितीचं सार सांगतो.
कृष्णा पंडितचे (दर्शन कुमार) कुटुंबीय तो लहान असताना याच दहशतीचे बळी ठरलेले असतात. तो याबाबत अनभिज्ञ असतो. तो त्याचे आजोबा पुष्कर (अनुपम खेर) यांच्याकडे लहानाचा मोठा होतो. कालांतरानं पुष्कर यांचं निधन होतं.
त्यांचं अस्थीविसर्जन करण्यासाठी तो काश्मीरमध्ये येतो. त्यावेळी कृष्णा पुष्कर यांच्या चार जिवलग मित्रांना (मिथुन चक्रवर्ती, पुनित इसार, प्रकाश बेलावडी, अतुल श्रीवास्तव) भेटतो. त्यांच्याशी बोलण्यातून कृष्णाला त्याच्या कुटुंबियांच्या मृत्युमागचं सत्य कळू लागतं.
चित्रपटात मांडलेला विषय आणि भूमिका बघितल्यानंतर सत्य-असत्य काय, योग्य-अयोग्य बाजू कोणती या सगळ्याचं आकलन ज्यानं-त्यानं करावं. पण तत्कालीन काश्मिरी पंडितांचं झालेलं शोषण, त्यावेळचं दाहक वास्तव, भीषणता, परिणाम दाखवण्याच्या ज्या हेतूनं दिग्दर्शकानं चित्रपट केला आहे, त्यात तो पूर्ण यशस्वी ठरला आहे.